fbpx

प्रकल्पांबाबत शिवसेनेने दुटप्पी भूमिका सोडावी

bjp-shivsena war

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुतोंडी आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेनेचे मंत्री एक बोलतात आणि जिल्ह्यात आल्यानंतर वेगळेच बोलतात, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केले. जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत युतीचा धर्म शिवसेनेच्या नेत्यांनी पाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहावर माने यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते म्हणाले, कोकणात भाजप सरकारच्या माध्यमातून अडीच लाख कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यातून एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. रिफायनरी प्रकल्प शंभर टक्के प्रदूषणविरहित आहे. या प्रकल्पासाठी समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर जमिनीचा मोबदला दिला जाईल. जमिनीचा दर वेगळा असेल. झाडे, घरेआणि इतर मालमत्तेची भरपाई वेगळी दिली जाईल. प्रकल्पबाधित नागरिकांचे शंभर टक्के पुनवर्सन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार व मंत्र्यांनीही प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाणारचा रिफायनरी प्रकल्प होईल. शिवसेनेने भावनेचे राजकारण करू नये. रिफायनरी प्रकल्प राजापूरला झाला तर त्याला विरोध असेल मात्र गुहागरमध्ये आम्ही या प्रकल्पाचे स्वागत करू, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. त्यांची भूमिका नागरिकांना समजली नाही. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे, तर सेनेचे उद्योगमंत्री या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत. ग्रामस्थांचाही प्रकल्पाला विरोध नाही. जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध केला परंतु तोही प्रकल्प झाला. सेनेची विरोधाची भूमिका नक्की कशासाठी हे समजत नाही, असे बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.