राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा, सीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी – शेलार

आशिष शेलार

मुंबई – परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याच सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे असे शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. ते म्हणाले, प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांच लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे.

राष्ट्रीय नागरीक नोंदवही (NRC) ला शिवसेनेचा विरोध आहे मग परराज्यातील नागरिकांची नोंदवही चा पुरस्कार कसा करता असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ॲड शेलार यांनी केली.

गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत असं सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्याव असा सल्ला त्यांनी दिला.

बालहट्टापायी मुंबईची प्राथमिकता बदलली

पेंग्विनच्या टेंडरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ॲड आशिष शेलार म्हणाले, बालहट्टापायी मुंबई शहराची प्राथमिकता महापौर आणि शिवसेनेने बदलली आहे. ४३७ स्वे किमीच्या मुंबईतील २०५५ किमीवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॅार्डला २ कोटी म्हणजे १ कोटी ४० लाख मुंबईकरांसाठी फक्त ४८ कोटी खर्च करणार पण तेच एका पेग्विंनसाठी १५ कोटी खर्च करणार आहेत.

यावरुन प्रशासकीय रचना बालहट्टासाठी कोणत्या थराला जाउ शकते हे दिसतय. यात मुंबईकरांच्या हिताचा विचार नाही आहे. पेग्विंनमुळे आमदनी वाढली अस आयुक्तांच वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची टीका करत असच असेल तर पेग्विंन आणा आणि तुमच्या खुर्च्या खाली करा असे त्यांनी सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या