‘कायद्याचा धाक नाही असे ‘कठुआ’, ‘हाथरस’ प्रकरणात म्हणावे लागेल’, शिवसेनेचा भाजपवर पलटवार

sanjay raut

मुंबई: साकीनाका बलात्कारप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला गेला. राज्यात कायद्याचा, पोलिसांचा धाक राहिला की नाही, असे सवाल केले गेले. मुंबई सारखं शहर महिलांसाठी किती सुरक्षित आहे, यावर प्रश्न केले गेले. भाजपने यापार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले. या सर्व प्रश्नांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून प्रतिउत्तर देत पलटवार केला आहे.

साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात. व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणार्यांना राजाश्रय होता व आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारने घाईघाईने जाळून पुरावाच नष्ट केला व तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिले जात नव्हते.

हाथरस प्रकरणात ”बलात्कार झालाच नाही हो!” असे योगींचे सरकार सांगत होते, ते शेवटी खोटे ठरले. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक साकीनाका प्रकरणात ज्या तातडीने मुंबईत पोहोचले, ती तत्परता या आयोगाने हाथरसप्रकरणी दाखवली नव्हती.

‘कठुआ’ बलात्कार प्रकरणातही बलात्काराचे समर्थन करण्यासाठी एका राजकीय पक्षाचे लोक रस्त्यावर उतरले होते. कायद्याचा धाक नाही असे म्हणायचे असेल तर ते या अशा प्रकरणांत म्हणावे लागेल. साकीनाका प्रकरणात पोलिसांनी 10 मिनिटांत आरोपीस गजाआड करून कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून दिले. मुळात हे जे विकृत नराधम असतात त्यांना कायदा वगैरे काही कळत नाही. त्यामुळे ही विकृती दिसेल तेथे ठेचून काढणे हाच उपाय योग्य ठरतो. साकीनाक्यातील पीडित महिलेस दोन मुली आहेत. त्या निराधार झाल्या आहेत. त्या मुलींच्या शिक्षणाची व पुढची जबाबदारी राज्य सरकार घेत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली हे सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय? राज्यात कायद्याचा धाक आहेच व राज्याला मनही आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अशा घटना वाढल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे हे कायद्याबरोबरच समाजाचेही काम आहे. असे म्हणत त्यांनी राज्यात कायद्याचेच राज्य असून मुंबई हे महिलांसाठी जगातील सर्वांत सुरक्षित शहर असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :