मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी- विखे पाटील

shivsena and vikhe patil

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपका विखे पाटील यांनी शिवसेनेवर ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात. शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ पुरे करून त्यांनी आजच्या आज सरकारबाहेर पडण्याची घोषणा करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिवसेना यापुढेही सत्तेत कायम राहिली तर शेतकऱ्यांप्रमाणेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही शिवसेनेचा कळवळा बेगडी असल्याचे स्पष्ट होईल, असेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान,मराठा आंदोलकांशी सरकार चर्चेस तयार आंदोलकांना शांतता राखावी अस आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चाची सरकारने दखल घेतल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.