परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी खा. संजय जाधव आक्रमक, 26 जानेवारीपासून जनआंदोलनाची तयारी

MP Jadhav aggressive for medical college in Parbhani, preparing for mass agitation from January 26

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीकरिता येत्या 26 जानेवारीपासून सर्वपक्षीय लढा उभारला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी गुरुवारी दिली. उस्मानाबादच्या फक्त 200 खाटांच्या रुग्णालयास वैद्यकीय महाविद्यालयासाठी तातडीने मान्यता मिळते, परंतु 500 खाटांच्या परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठीसुद्धा आणला जात नाही, अशी खंत खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी व्यक्त केली.

मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व राज्यसभेच्या राज्यातील सदस्यांना एका बैठकीसाठी पाचारण केले होते. या बैठकीत परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार जाधव यांना परभणीचा प्रस्ताव राज्यमंत्रिमंडळ बैठकीसमोर निश्रि्चतच आणला जाईल, त्यास मान्यता बहाल केली जाईल, अशी ग्वाही दिली.

वैद्यकीय प्रवेशाकरिता मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर लादलेल्या 70:30 चे अन्यायकारक प्रमाण हटवल्याबद्दल खासदार जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या प्रस्तावास राज्यमंत्रिमंडळाद्वारे तातडीने मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. खासदार जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना 26 जानेवारी रोजी सर्वपक्षीय नेतेमंडळींचे निवेदन देण्यात येणार आहे. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी जनआंदोलनाची निश्चित अशी रूपरेखा जाहीर केली जाईल.

महत्वाच्या बातम्या