मराठा आरक्षण : अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा 

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

भाजपच्या ‘या’ उपमुख्यमंत्र्यांनी दिला पदाचा राजीनामा

माझ्या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी लोकांना जीव दयावा लागतो, त्यामुळे मला विधानसभेत जाण्यास रस नाही. माझ्या मतदारसंघात मी किंग आहे. मला राजकारण करायचे नाही. यापूर्वी दोन वेळा राजीनामा दिला होता, आता तिसऱ्यांदा राजीमाना दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. मराठा आरक्षण द्या नाही तर राजीनामा मंजूर करा, असेही जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

दरम्यान,मराठा आंदोलकांशी सरकार चर्चेस तयार आंदोलकांना शांतता राखावी अस आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चाची सरकारने दखल घेतल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

मराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव