शिवसेनेच्या वतीने ठाण्यात ‘महाआरोग्य यज्ञ’; गरजूंना मिळणार मोफत उपचार

ठाणे: ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ठाण्यातील किसन नगर २, नेपच्यून एलिमेंट, वागलळे इस्टेट येथे हे शिबीर पार पडणार आहे.  नवजात बालकापासून ते वयोवृद्ध नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

महाआरोग्य तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे, तसेच पुढील शस्त्रक्रियेसाठी मदतदेखील करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत. ठाणे आणि मुंबईतील नामांकित हॉस्पिटल्स तसेच डॉक्टरांच्या संघटना यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाआरोग्य शिबिराचा आढावा घेतला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली, यावेळी शिबिराची धुरा सांभाळणारे डॉ जे बी भोर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून रुग्ण आणि सरकारी विभाग, धर्मादाय ट्रस्ट, विविध संस्था यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला जातो. यासाठी खास वैद्यकीय सहायकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, मागील सहा महिन्यांमध्ये रुग्णांना दीड ते दोन कोटीं रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात वैद्यकीय कक्षाने मदत केली आहे.