मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी लेहमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची भेट घेतली. सरकारी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संसदीय स्थायी समित्यांचा भाग म्हणून दोन्ही नेते लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या नियोजित दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचीच भेट घेतली नाही तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीच्या छायाचित्रात संजय राऊत रवी राणा यांच्यासोबत जेवण करताना, गप्पा मारताना दिसले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. शिवसैनिक नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्यानंतर अटक झाल्यापासून राणा दाम्पत्याचे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाशी मतभेद आहेत. अटक झाल्यानंतर राणा दाम्पत्याला ५ मे रोजी तुरुंगातून जामीन मिळाला. या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता. सुटकेनंतर अमरावतीच्या खासदाराला स्पॉन्डिलायटिसमुळे भायखळा कारागृहातून लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते. या जोडप्याने महाराष्ट्र सरकारवर ‘सत्तेचा गैरवापर’ केल्याचा आणि तुरुंगात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
शिवसैनिकांच्या तोंडात बोटं
23 एप्रिलला राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. अनेकांवर पोलिसांनी केसेस दाखल केल्या आहेत. आता रवी राणा यांच्यासोबत जेवायला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नवनीत राणा यांना धमकी दिली होती. मात्र आता संजय राऊतांचा व्हायरल फोटो पाहून शिवसैनिकांच्या तोंडात बोटं गेले आहेत. शिवसैनिक प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आगे.
हनुमान चालीसा पठणाच्या वादातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा आणि संजय राऊत एकमेकांच्या निशाण्यावर आहेत. दोघेही एकमेकांवर सतत हल्ले करत असतात. चुकीचे सल्ले देऊन साम्राज्य बुडवू पाहणाऱ्या राऊत यांना उद्धव ठाकरेंचे शकुनी मामाही राणा यांनी म्हटले होते.
नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांवर खोचक प्रहार
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे, जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती”.
“अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
राऊतांनी राणा दाम्पत्याला २० फूट खोल गाडण्याची दिली होती धमकी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्या वक्तव्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याची तक्रार करणार आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. पण तशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता मी अमित शाह यांना भेटून केंद्रातूनच संजय राऊत यांच्यावर कारवाई करायला लावणार, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :