शिवसेना देशातील दुसरा श्रीमंत पक्ष; मिळाले १११.४०३ कोटींचे रोखे दान

शिवसेना

नवी दिल्ली : शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष म्हणून जाहीर झाला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने घोषीत केलेल्या अकडेवारीनुसार शिवसेनेला निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँण्ड) द्वारे १११.४०३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. देशातील प्रमुख एकूण १४ पक्षांनी आपल्या देणग्या जाहिर केल्या आहेत. त्यात तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष  पहिल्या क्रमांकावर आहे.

निवडणूक रोखे म्हणजे काय?

‘निवडणूक रोखे’ हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून कोणत्याही नागरिकाला विकत घेता येतात. हे समभाग १ हजार रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत असतात. त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. रोखे विकत घेणारा ते रोखे कोणत्याही पक्षाच्या प्रचारनिधीसाठी दान म्हणून देऊ शकतो. हे रोखे पंधरा दिवसांत कोणत्याही शाखेतून वटवून घेता येतात. या योजनेचा सर्वाधिक लाभ २०१७-१८ मध्ये भाजपला झाला होता. भाजपाला तब्बल २१० कोटी रुपये किंमतीचे ९४.५ टक्के रोखे दान म्हणून मिळाले होते.

एडीआरच्या अहवालानुसार, टीआरएस, टीडीएस, वायएसआर सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए या १४ पक्षांनी निवडणूक देणगी जाहीर केली आहे. २०१९-२० या काळात निवडणूक रोखेच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला याची माहिती जाहीर केली आहे.

मागच्या निवडणुकीत किमान एक टक्के व त्यापेक्षा अधिक मते पक्षाला मिळणे गरजेचे आहे तरच हा पक्ष निवडणूक रोखे मिळवण्यासाठी पात्र ठरतो. राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या बँक खात्यातच हा निधी जमा करावा लागतो. निवडणूक रोखे खरेदी करताना खरेदीदारास आपला संपूर्ण तपशील देणे बंधनकारक असते. स्टेट बँकेला त्याचा अहवाल बँकेला सादर करावा लागतो. हे बाँड ग्राहकाने कोणत्या पक्षाला दिला हे सांगणे बंधनकारक नसते.

महत्वाच्या बातम्या