शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?

pawar-thackeray-fadanvis

पुणे – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगीत भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी आगामी काळात मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधी करत असल्याची देखील कुजबुज सुरु झाली.

सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलला जाईल अशी शक्यता वर्तविली जात असताना शिवसेनेने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक येथे बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना हा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने प्रत्येकाला स्वाभिमान आहे. हे वातावरण गेल्या वेळच्या सरकारमध्ये होतं का याबद्दल शंका आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे’

‘आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं’ असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राऊत हे दावा करत आहेत तेवढे राजकारण सोपे असते तर सेनेसाठी ते किती बरे झाले असते. भाजपला धोका देवून शिवसेना सत्तेत आली असा भाजपकडून वारंवार केला जातो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत हे एक उघड गुपित आहे.  शरद पवार यांचा देखील इतिहास अवघ्या महाराष्ट्रातला ठावूक आहे.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील हा संजय राऊत यांचा दावा किती खरा ठरणार याबाबत साशंकता आहे. मित्र पक्षांवर विश्वास असेल तर बाहेर चर्चा काहीही सुरु असली तरीही वारंवार हे सरकार ५ वर्षे टिकेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहणार हे राऊत यांना वारंवार का सांगावे लागत आहे हे एक न उलघडणारे कोडे आहे. दरम्यान, यामुळेच शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही हा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या