महात्मा फुले यांचे समतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत : नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा: महात्मा फुले यांचे समतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत त्यामुळेच शिवसेना ते टीका करत आहेत. शिवसेना केवळ एका पगडीला का घाबरत आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले यांच्या पागोट्यानेच स्वागत करायचं, असा आदेश दिला.पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

पवारांच्या याच कृतीचा राऊत यांनी समाचार घेतला. पगडी ही पुणेकरांचा सन्मान आणि वैभव आहे, सर्वांनी पगडीचा सन्मान राखण गरजेचं त्यामुळे शरद पवारांनी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान आहे . त्यांच्या प्रत्येक कृतीत काही न काही अर्थ असतो. लवकरच पगडीच्या मागे काय राजकारण दडले आहे हे बाहेर येईल म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली.

नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महात्मा फुले यांची पगडी वैचारिक पगडी आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून प्रयत्न करत आहोत. शिवसेनेला समतावादी विचार पटत नाही. त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता.

दलित,ओबीसी,आदिवासी समाजाला आरक्षण देण्याच्या वेळीही शिवसेनेने वाद निर्माण केला. महिला आरक्षण देण्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की महिलांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित रहावे.शिवसेनेचे विचार प्रतिगामी आहेत. महात्मा फुले यांचे समतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत म्हणून ते टीका करत आहेत. शिवसेना केवळ एका पगडीला का घाबरत आहे? फुले यांच्या पगडीत मोठी ताकद आहे हे यातून स्पष्ट होते.