‘खंडणी मागणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे’; नितेश राणे कडाडले

NITESH RANE

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने हा आरोप केला असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता. त्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी त्यांना टोला लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

शिवसेनेने काय म्हटले होते?
अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP