मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार अस्थिर झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत भाष्य केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत या लाइव्हमध्ये दिले आहेत. यानंतर आज सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना वेळीच शहाणे व्हा! असा इशारा देण्यात आला आहे. तसेच भाजपावर देखील सडकून टीका केली आहे.
नेमकं काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही . त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले . त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार ? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत.
राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये.
सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच – डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते.असं अग्रलेखात म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :