fbpx

गुजरातच्या निकालाने भाजपमधील काहींच्या ‘मन में लड्डू फुटें’ परिस्थिती; सामनामधून भाजपला चिमटे

udhav thackeray and samna

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीत भाजपला निसटता विजय मिळाला, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचारकरूनही भाजपला शंभरी गाठता आली नाही. यावरूनच ‘२०१९ मध्ये ३५० च्यावर जागा जिंकू’ या कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कमळ फुलविण्याच्या गर्वाचा फुगा गुजरातच्या निकालानंतर फुटला असल्याचा टोला ‘सामना’मधून लगावण्यात आला आहे. तसेच ‘खांदे पाडलेल्या मानसिकतेतून काँग्रेस पक्ष जागा झाला आहे. एकेकाळी पप्पू म्हणून ज्याला हिणवले तेच राहुल गांधी काँग्रेससाठीच नाही तर तमाम सेक्युलरवाद्यांसाठी हीरो ठरत आहेत. राजकारणात सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला आलेले नसते, हा धडा पुन्हा गुजरातने शिकवला असून देशाचे दोन्ही राष्ट्रीय पक्ष सध्या राजकीय अनिश्चिततेच्या टकमक टोकावर उभे असल्याच’ म्हणत सामनाच्या अग्रेलेखातून भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत.

काय आहे आजचा अग्रलेख
‘हम देडसों से नीचे आ ही नही सकते भाईसाब… लिख लो’ हे गुजरातच्या निकालापूर्वी भाजप मुख्यालयात ऐकू येणारे हमखास वाक्य. भाजपाध्यक्षांनीच ‘मिशन १५०’ ठरविल्यानंतर कार्यकर्ते तरी काय करणार म्हणा मात्र या दीडशेचे तीनतेरा वाजल्यानंतर याच भाजप मुख्यालयात १८ डिसेंबरला विजयाचा जल्लोष करायचा की नाही? पंतप्रधानांना बोलवायचे की नाही, यावरच मोठे चिंतन झाले. वास्तविक, दुपारी २ वाजता मोदीजींच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष करायचा मनसुबा पक्षनेतृत्वाचा होता. मात्र भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंटचा काँग्रेसने भुगा करायला सुरुवात केल्यानंतर दोन नंतर चारपर्यंत वेळ पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सत्ताधाऱयांचे ‘हार्टबीट्स’ आणखी वाढले. अखेर कसेबसे जिंकतोय हे समजल्यानंतर पंतप्रधान भाजप कार्यालयात आले. तिथेही कार्यकर्त्यांनी अमित शहांचे भाषण रोखून ‘मोदी मोदी’चा जयघोष केला. त्यामुळे हा जल्लोष वेगळ्या अर्थाने गाजला. गुजरातचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर, गुजरात हातून गेल्याचा ‘आयबी’चा रिपोर्ट होता. त्यानंतर पंतप्रधानांनी मॅनेजमेंटगुरूंसह सर्वांनाच बाजूला सारत आपल्या हाती निवडणुकीची सगळी सूत्रे हाती घेतली. त्यामुळे कसेबसे गलबत सत्तेच्या किनाऱ्याला लागले.

भाजपच्या या निसटत्या विजयाचा आनंद काँग्रेसला जेवढा झाला नाही तितकी ‘मन में लड्डू फुटें’ अशी परिस्थिती अनेक भाजपवाल्यांची आहे. ‘भाईसाब अब तो ये लोग सुधर जायेंगे और हम भी’ ही एका भाजप नेत्यांची खासगीतील प्रतिक्रिया मार्मिक आहे. मैदानात उतरलो तर आपण लढू शकतो. आपण अगदीच गलितगात्र नाही याची जाणीव गुजरातने काँग्रेसला करून दिली. त्यामुळे आगामी कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश या महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका या खऱ्या अर्थाने लोकसभेचे सेमिफायनल असतील. राजकारण हे प्रवाहासारखे असते त्यात नेहमीच वेगवेगळी वळणे प्रवाह येत असतात. गुजरातने एकतर्फी चालणारे देशाचे राजकारण बदलवले आहे. राजकारण ‘२४ बाय ७’ काम आहे, हे जर राहुल गांधींनी मनावर बिंबवून घेतले तर, २०१९ मध्ये सत्ताधाऱयांचे ‘विकास गांडो थयो छे’ राष्ट्रीय पातळीवरही व्हायला वेळ लागणार नाही. दुसरीकडे गुजरातचा धडा घेऊन जनताभिमुख, पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य कारभार लोकशाही पद्धतीने हाकल्यास किमान भाजपसाठी ‘अच्छे दिन’ सुरू राहतील, यात शंका नाही. टकमक टोकावरून दोन्ही राष्ट्रीय पक्ष सध्या ऐकमेकांस रोखून पाहत आहेत. आगामी वर्षभरातील रणनीतीनंतरच त्यापैकी कोणाचा कडेलोट होईल, ते समजेल. तूर्तास दोघे एकसमान पातळीवर आलेत, हेही नसे थोडके.

1 Comment

Click here to post a comment