fbpx

युतीच्या बदल्यात शिवसेनेने भाजपकडे मागितले मुख्यमंत्रीपद

मुंबई : भाजपा- शिवसेना युती कायम राहावी यासाठी अमित शहा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर अनेक तर्क- वितर्कांना उधाण आले होते. परंतू शिवसेनेने या बैठकीत भाजपाला जागावाटपासाठीचा फॉर्म्यूला सांगितल्याचे समजते.शिवसेनेने विधानसभेतील २८८ पैकी १५२ जागांसहित मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे द्यावे, असा प्रस्ताव दिल्याचे समजते. आता शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपाची भुमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा- उद्धव ठाकरे भेटीत शिवसेना नेतृत्वाने अमित शहांसमोर जागावाटपासाठीचा प्रस्ताव मांडला आहे. यात लोकसभा निवडणुकीत भाजपास ‘मोठ्या भावा’चा मान देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १५२ जागा आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावी, असा हा प्रस्ताव होता.

या प्रस्तावावर अमित शाह यांनी ठोस आश्वासन देणे टाळले. याबाबत पुढील बैठकीत चर्चा करु असे सांगत अमित शहा तिथून निघून गेले, असे वृत्तात म्हटले आहे.शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाला २०१४ मध्ये जेवढ्या जागा दिल्या तेवढ्याच जागा आगामी लोकसभा निवडणुकीत देण्याची शिवसेना नेतृत्वाची तयारी आहे. लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढवण्यास पक्षनेतृत्व तयार आहे. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला जास्त जागा आणि मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी पक्षनेतृत्वाची भूमिका आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपाची भूमिका महत्त्वाची ठरेल. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत दिल्लीत पुन्हा भाजपाची सत्ता आली तर राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूने झुकतील आणि याचा फटका शिवसेनेला बसेल, अशी भीती शिवसेनेला वाटत असण्याची शक्यता आहे.