शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरू : नारायण राणे

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरू असून त्यांनीच मला घडवलं. अशा भावना माजी मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केल्या. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अनुभव शून्य असून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना अनुभव नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली. पुण्यात आयोजित ‘सॅटर्डे क्लब’ या कार्यक्रमात बोलत होते. सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना राणे यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 40 वर्षात कधीही राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी काम केलं नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील असं कधीच वाटलं नव्हतं. ते अनुभव शून्य असून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही हे माहीत नाही. पण राज्यातील जनतेचं नक्की नुकसान होणार,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

“उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात राज्याचा मुख्यमंत्री यांचा मान-सन्मान ठेवावा म्हणून त्या पदाचा मान ठेवतो. मात्र व्यक्ती म्हणून ते अनुभव शून्य असून राज्य अधोगतीकडे जाईल,” असं ही राणेंनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात अत्यंत चोखपणे काम केलं. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले नाही. सर्व प्रश्न यशस्वी सोडवले.