छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकावणार; शिवसेनेच्या मेळाव्यात गर्जना

chhagan bhujbal vs shivsena

नाशिक : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विसंगत विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आता दोन वर्ष पूर्ण होतील. मात्र, या काळात आघाडीतील मतभेद, नाराजी, नेत्यांसह कार्यकर्त्यांची फोडाफोडी अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र वरिष्ठ नेत्यांनी आघाडीला बाधा येणार नाही याची विशेष काळजी घेतली.

मात्र, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या तीन पक्षांमध्ये ताण वाढण्याची चिन्हे आहेत. तीनही पक्ष आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. दरम्यान, काल राज्याचे मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या वादाची चांगलीच चर्चा झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांचे आज मनोमिलन करून देण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या एका निश्चयामुळे भुजबळ आणि शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडू शकते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. याची सुरुवात आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून सुरुवात झाली. यावेळी पुढील निवडणुकीत येवला विधासभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवायचा निश्चय शिवसैनिकांनी केला. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की पुढील निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना देखील कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्या.

यावेळी विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे ,माजी आमदार कल्याणराव पाटील, स्थानिक नेते संभाजी पवार यांनीही आम्ही तयार आल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेकडून आव्हान निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या