दलबदलू नेत्यांना लॉटरी : आघाडीतून युतीमध्ये आलेल्या विद्यमान आमदाराची जागा कायम राहणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर काल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली. भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई सहभागी झाले होते. कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालं नसून जागा वाटपाच्या सूत्रावर काल चर्चा झाल्याचं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं.

विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून युतीमध्ये आलेल्या विद्यमान आमदारांना संबंधित पक्षाचा विद्यमान आमदार समजून ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येणार असल्याचं या नेत्यानं सांगितलं. बहुतांशी विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदार संघातून तिकिट दिलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मित्र पक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर कालच्या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्ष हे भाजपबरोबर असून त्यांना किती जागा सोडायच्या, हे आधी ठरविले जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. शिवसेनेचा मात्र निम्म्या जागांचा आग्रह आहे. घटकपक्ष भाजपबरोबर असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने त्यांना भाजपने आपल्या कोटय़ातून जागा द्याव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

दरम्यान,भाजपने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार भाजप महायुतीला 229 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. तसेच या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीतही भाजप – शिवसेना युती करूनच निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या