मनसेला जबर धक्का, शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : मनसे नेते शिशिर शिंदे येत्या 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच दिवशी शिंदे सेनेत घरवापसी करणार आहेत. शिवसेनेने मनसेला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा नुकताच वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला, त्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्या वेळी भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाल्याचे शिंदे यांनी सांगितले होते मात्र याच भेटीत शिवसेनेत प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती.दरम्यान, राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडारपडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते.