“मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”

शिरूर : मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या खास शैलीत आज शिरूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केला. शरद पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असे व्यक्तव्य हि अजित पवार यांनी यावेळी केले. एका शोरूमच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

शिरूर लोकसभेला, विधानसभेला काय गंमत होते ते कळतच नाही. राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात कुणीही उभे राहिले तरी निवडून येईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. तरीही मागे का सरायचे हा प्रश्नच पडतो. मी स्वतः काल पवार साहेबांना सांगितले आहे की, शिरूर लोकसभेसाठी योग्य उमेदवार मिळत नसेल, तर माझी लोकसभा लढायची तयारी आहे. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही. अजित पवार जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू, असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.