fbpx

शिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष?

पुणे :(प्रवीण डोके) लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने सर्व पक्ष जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत. त्या दृष्टीने सर्वच पक्ष त्या त्या लोकसभा मतदार संघात उमेदवाराची चाचपणी करताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्ष्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.

शिरूर लोकसभेसा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे गेल्या तीन निवडणुकीमध्ये निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात सध्या राष्ट्रावाडीकडून सक्षम उमेदवारीचा शोध चालू आहे. तर भाजपकडूनही तसाच उमेदवार शोधला जात आहे.

शिरूर लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्यासह भाजपचेही प्राबल्य वाढलेले दिसत आहे. शिवसेना-भाजप युती होणार की नाही हा निर्णय अजूनही झालेला नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्ष्यांनी आपल्या आपल्या उमेदवाराची जोरदार तयारी केली आहे. त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा.

राष्ट्रवादी
उमेदवार : सध्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर पक्षाने आदेश दिला तर माझी लढायची तयारी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने त्यांच्याही नावाची चर्चा आता सुरु झाली आहे. या पाच नावापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते आहे.
परिस्तिथी : तीन निवडणुकांपासून अजय असणाऱ्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांना रोखणाऱ्या उमेदवाराचा सध्या राष्ट्रवादीकडून शोध सुरु आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे गावकीभावकीचा विचार करून लांडे यांना थेट विरोध करणार नाहीत, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम पक्षाकडे लोकसभेची अधिकृतपणे उमेदवारी मागणारे ते सध्या तरी एकमेव आहेत आणि त्यांनीही त्या दृष्टीने तयारी चालवली आहे. सध्यातरी राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.

अजित पवार हे बोलल्याप्रमाणे शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरले, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

शिवसेना
उमेदवार : विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
परिस्तिथी : शिरूर लोकसभेत आढळराव हे सलग तीन वेळा खासदार झाले आहेत. चौथ्यांदा शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी आढळराव-पाटील यांनी शड्डू ठोकले आहेत. आढळरावांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच आपल्या मतदार संघात त्यांनी बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत. तळागाळातील लोकांशी असणारा त्यांचा संपर्क, प्रश्न सोडविण्याची हातोटी यामुळे त्यांचे लोकमताचे पारडे कायम जड राहिलेले आहे.

या लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद असली तरी, सध्या भाजपची वाढलेली ताकद आढळराव यांची डोकेदुखी ठरू शकते. त्यासोबतच मतदारसंघात गेली अनेक वर्षे असलेले काही प्रश्न अजूनही कायम आहेत. बैलगाडा शर्यती, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न, नाशिक रस्ता रुंदीकरण, नाशिक-पुणे रेल्वे, चाकण विमानतळाचा स्थलांतर प्रश्न यामुळे खासदार आढळराव ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

भाजप
उमेदवार : भोसरीचे आमदार महेश लांडगे
परिस्तिथी : भाजप, शिवसेना युती न झाल्यास भाजपच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदार संघातून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भावी खासदार म्हणून डिजिटल बॅनर लावले होते. यावरूनच ते लोकसभेच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर लांडगे यांनी प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडल्याची चर्चा आहे. युती न झाल्यास भाजपने आमदार महेश लांडगे यांना रिंगणात उतरवण्याचे नियोजन केले असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय झाला तरी, मतदारसंघांत भाजपच्या संघटनात्मक बांधणीचे काम अनेक दिवसांपासून सुरूच आहे. भाजपचा उमेदवार कोणत्याही क्षणी रिंगणात उतरवण्याची वेळ आली तरी ते निवडून आणण्याइतकी तयारी भाजपने चालवली असल्याचे दिसून येत आहे.

मनसे
उमेदवार : माजी सभापती मंगलदास बांदल
परिस्तिथी : या लोकसभा मतदार संघात सध्या तरी उमेदवाराचे नाव स्पष्ट नाही. परंतु काही दिवसांपूर्वी खेड येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत बांदल यांनी मला लोकसभेला संधी दिली तर मी तयार आहे असे वक्तव्य केले होते. माजी सभापती मंगलदास बांदल यांचे नाव राष्ट्रवादीकडूनही चर्चेत आहे. परंतु राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यास ते मनसेकडून उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय होऊ शकत?
सध्यातरी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल
शिरूर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये भोसरी, खेड, शिरूर, हडपसर, आंबेगाव, जुन्नर हे विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये भाजप तीन, राष्ट्रवादी एक , शिवसेने एक आणि मनसे एक असे विधानसभा आमदार बालाबल आहे.