पुरस्कार वापसीला सुरुवात : साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार उर्दू पत्रकार शिरीन दळवी

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसण्यास सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या तिथली परिस्थिती बिघडली असून तणावाचं वातावरण आहे.

हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर आता पुरस्कार वापसीला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध उर्दू पत्रकार आणि साहित्यक शिरीन दळवी आपला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा आपल्या राज्यघटनेवर, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा करताना शिरीन दळवी यांनी सांगितले, ‘भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुखी आहे. हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. याच अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा करत आहे’.

‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे विधेयक आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या माझ्या समुदाय आणि सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे. गंगा जमुनी तहजीब आणि संविधान जपण्यासाठी आपल्याला ठाम राहावेच लागेल’. असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी राजीनामा दिला आहे.अब्दुल रहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली.

या विधेयकाबाबत देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या धार्मिक बहुलतेविरोधात असल्याचे रहमान यांनी सांगितले. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या