शिराळा तालुक्यातील शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात नरबळी ?

superstition

टीम महाराष्ट्र देशा – शिराळा तालुक्यातील शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एका अज्ञात इसमाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळून आल्यामुळे हा प्रकार नरबळीचाच असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

शिरसीच्या पूर्वेला आणि शिवरवाडीच्या पश्चिमेला दोन्ही गावच्या सीमेवर श्री चक्रभैरवनाथाचे मंदिर आहे. डोंगरमाथ्याच्या ठिकाणचा हा परिसर निर्जन असतो. याच ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंदिराचे व्यवस्थापन चक्रभैरव विश्वस्त मंडळाकडून चालते. सध्या मंदिराच्या गाभाऱ्याचे व सभामंडपाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम मजूर शुक्रवारी ५ वाजता काम संपवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी (शनिवार) सकाळी ७.३०च्या दरम्यान हे कामगार परत कामासाठी मंदिरात आले. काम सुरू करण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून ते गाभाऱ्यात गेले असता मूर्तीच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि कानशिलावर जबर जखमा आहेत. शेजारी टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ आणि हळदकुंकू असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.अंदाजे ४० ते ४२ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौर्याची परिसिमा, माणुसकीला काळिमा हे शब्दही अपुरे पडतील, अशा पद्धतीने या व्यक्तीचा खून करण्यात आला असून मंदिरात रक्ताचा पाट वाहिल्याचे चित्र दिसून आहे.

सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटवणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक अंदाजावरून अज्ञाताने दगडविटांचा वापर करून हा खून केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे उपअधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले तर मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे शिराळा तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवार-शनिवारी अमावस्या होती. त्यातच हळदीकुंकू, लिंबू, टाचण्या आणि मूर्तीसमोरच केलेला खून यामुळे तो नरबळीच, असावा अशा चर्चेला ऊत आला आहे.