राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू असल्याचा शिंगणेंचा दावा

rajendra shingane

मुंबई – मागील काही दिवसांत राज्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढल्याने त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांची मागणीही फार मोठ्या प्रमाणात वाढली होती. पुरेशा साठ्याअभावी राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा भासत होता. पण आता परिस्थिती बदलत असून राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी २१ एप्रिल २०२१ ते ०९ मे २०२१ या कालावधीसाठी एकूण ८,०९,००० एवढा कोटा मंजूर केलेला असून, येत्या काही दिवसात हे रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्यासाठी ४,७३,५०० रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दि. ३० एप्रिलपर्यंत ३,४४,४९४ इतका साठा शासकीय व खासगी रुग्णालयांना वितरीत झाला असल्याची माहिती शिंगणे यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यांतून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार केले आहे. दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा याचे विवरणपत्र उत्पादकांना देण्यात आले आहे. या कामासाठी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या