पोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी शेवगावमध्ये बंद आंदोलन

अभिजित कटके

अहमदनगर : एका नागरिकाच्या कामाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात गेलेले शेवगावचे नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांना पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी उत्स्फुर्त बंद पाळून पोलीसांच्या दडपशाहीचा निषेध केला.

शेवगावमधील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनतकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील एक निवेदन सादर करून पोलीस निरीक्षक ओमासे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशोक आहुजे हे एका नागरिकाच्या कामाच्या अनुषंगाने शेवगाव पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली.त्यामुळे ओमासे यांना तात्काळ निलंबित करावे,अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे

.या शिष्टमंडळाने नगरमध्ये खा.दिलीप गांधी,आ.मोनिका राजळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदिंची भेट घेऊन त्यांना या घटने संदर्भात माहिती दिली आहे.सोमवारी सकाळपासूनच शेवगाव मधील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंद आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी अशा प्रकारे आहुजा यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.