fbpx

जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या शेट्टींनी केली अखेर दिलगिरी व्यक्त

Raju Shetty news

टीम महाराष्ट्र देशा : सैन्यात आपली पोरं सैन्यात जातात. देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं. शेट्टी यांनी केलेल्या या जातीयवादी वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

राजू शेट्टी यांनी केलेल्या या जातीयवादी वक्तव्याविरोधात ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने त्यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच देशभरातील या समाजातील संघटना आक्रमक होऊ लागल्या होत्या. पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवाय, आंदोलनाची देखील हाक दिली होती.

दरम्यान, या प्रकरणावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलताना माझ्याकडून अनावधनानं उल्लेख झाला. माझा मुळ उद्देश हा शहीद जवान आणि वारसांना न्याय देण्याचा होता. कुणीही माझ्या वक्तव्याने वाईट वाटून घेऊ नये असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. शिवाय, माझ्या मनाला जातीयवाद शिवू शकत नाही. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या जडणघडणीतला असून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा असल्याचं सांगत राजू शेट्टी यांनी सारवासारव केली आहे.

शहिद जनरल अरूणकुमार वैद्य यांच्यापासून विंगकमांडर अभिनंदन पर्यंत समाजातील कित्येक जण सैन्यात आहेत. एअरमार्शल भुषण गोखले, कर्नल अरविंद जोगळेकर, ब्रिगेडिअर हेमंत महाजन, जनरल डी. बी. शेकटकर यांच्यासारखी ब्राम्हण समाजातील शेकडो नावं सर्वांना ठाऊक असताना शेट्टी यांनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली होती. आता शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या पडदा पडेल अशी शक्यता आहे.