fbpx

युवा पिढीने राष्ट्रवादीच्या नादी लागू नये,पवारांपुढे राडा घालणाऱ्या नेत्याचा पक्षाला रामराम

shekhar gore

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं पहायला मिळत आहे, यामध्ये आता माण – खटाव तालुक्यातील युवा नेते शेखर गोरे यांनी देखील पक्षाला रामराम केला आहे. गोरे यांनी काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या समोर राडा घातला होता. पक्षातील कोणीही पवारांच्यापुढे मोठ्या आवाजाने बोलण्याची हिम्मत करत नसताना गोरे यांनी घातलेला राडा गाजला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर माझ्यावर अन्याय केला आहे, पक्षातील नेत्यांनीच माझे खच्चीकरणच केले. अंतर्गत राजकारणाचा मला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे युवा पिढीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादी लागून आपले आयुष्य खराब करू नये, असा घणाघात गोरे यांनी केला आहे. माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बाहेरून पाठींबा देत असल्याचं गोरे यांनी घोषित केले आहे.

शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत, गोरे यांनी आपल्याच भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. पक्षातील गटबाजीमुळेच आपण पराभूत झाल्याचा आरोप यावेळी यांनी केला होता.

आज साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपण राष्ट्रवादीला रामराम करत असल्याचं, गोरे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण केले जाते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पदाधिकार्यांचे खच्चीकरण झालेले आहे मात्र आपण अन्याय खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश न करता रणजितसिंह निंबाळकर यांना बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका शेखर गोरे यांनी घेतली आहे.