सन्मानाने आघाडीत घ्या, अन्यथा स्वबळावर लढू ; ‘शेकाप’चा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेतकरी कामगार पक्षाने कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला इशारा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे, अन्यथा आमची स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असे शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी म्हंटले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. याचदरम्यान कोल्हापुरातील टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात रविवारी दुपारी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. त्यावेळी धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने आम्हाला सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी आयोजित मेळाव्यात म्हंटले.

संपतराव पवार यांच्या या वक्तव्या नंतर मेळाव्याला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून पाठिंबा देखील दर्शविला.

शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने उभारते, ती यशस्वीही करते. परंतु निवडणुकीच्या मैदानात मात्र यश मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीने रणनीती आखली गेली पाहिजे, असे शेकापचे नेते बाबासो देवकर यांनी म्हंटले.

शेकाप सध्या जिंकण्याच्या नसल्या तरी पाडण्याची भूमिका चांगली निभावू शकतो, याचे प्रत्यंतर यापूर्वीही आलेले आहे. त्यामुळे आघाडीत शेकापला सन्मान मिळावा, असे भारत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर करवीरवर विधानसभा मतदार संघ हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शेकापचा तो पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असेही भारत पाटील यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा, या विधानसभा मतदार संघांसाठी दावा केला आहे.