मराठा आरक्षणावरील ‘ती’ पोस्ट भोवली, दादासाहेब मुंडे काँग्रेसमधून निलंबित

बीड : सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यावर मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, याच दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब मुंडे यांनी मराठा आरक्षण विषयावर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. ते प्रकरण आता त्यांच्या चांगलेच गलट आले. वरिष्ठांकडे अनेक तक्रारी गेल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले दादासाहेब मुंडेंची काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली होती. काँग्रेसमध्ये ते बाळासाहेब थोरात समर्थक म्हणून ओळखले जातात. थोरात प्रदेशाध्यक्ष असताना मुंडेंवर हिंगोली जिल्हा प्रभारी म्हणूनही जबाबदारी दिली होती. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंडे यांनी फेसबूकवर काही पोस्ट केल्या होत्या. यातील मजकूर आरक्षण विरोधी असल्याने मराठा समाजातून मुंडेंविरोधात तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे बीड जिल्ह्यातून अनेक तक्रारी याबाबत गेल्या होत्या. त्यानंतर आता पक्षाने ही कारवाई केलीय.

दरम्यान, या कारवाईनंतर आता दादासाहेब मुंडे यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरूनही काढून टाकावे, त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर समाजातून दबाव आहे. समाजाने याबाबत मागणी केली असली तरी धनंजय मुंडे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेय.

काय म्हटले आहे पत्रात?
दादासाहेब मुंडे हे घेत असलेली भूमिका पक्षाशी सुसंगत नाही, त्यामुळे पक्षाविषयी सामान्यांत संभ्रम निर्माण होतो. शिवाय, मुंडेंबाबत अनेक तक्रारी असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष माणिक जगताप यांनी पत्र पाठवून मुंडेंना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित केल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP