एक कहाणी तिहेरी तलाक विरुद्धच्या लढ्याची : शायरा बानो

sayara bano feacture image

दीपक पाठक ; शायरा बानो हे नाव आज संपूर्ण देशभरात घेतलं जात आहे. आज न्यायालयाकडून आलेल्या तिहेरी तलाकवरील ऐतिहासिक निर्णयात शायरा बानोच्या संघर्षाचा मोठा वाट आहे. आज हजारो महिलांचे संपूर्ण आयुष्य या तिहेरी तलाकमुळे क्षणार्धात उदवस्त होत आहे. असच काहीस घडल होत ते शायरा सोबत, मात्र त्यातून खचून न जाता तिहेरी तलाकविरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवला तो उत्तराखंडच्या काशीपूरमधील शायरानेच. मुस्लीम महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या शायरा बानो या स्वतः तिहेरी तलाक या अमानुष प्रथेच्या बळी ठरल्या आहेत.

shayara bano marraige photo
शायरा बानो / photo Courtesy Arshad Ali

शायरा बानो यांचा विवाह रिझवान अहमद याच्यासोबत २००२ साली झाला होता . लग्नानंतर सुखाचं आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शायराच्या नशिबी मोठ्याप्रमाणावर शारीरिक आणि मानसिक त्रास आला . लग्नाला दोन वर्षे होऊनदेखील शायरा अपत्य देऊ न शकल्याने तिला वारंवार तलाक देण्याच्या धमक्या देण्यात येवू लागल्या . सुदैवाने शायराने एक मुलगा आणि नंतर एका मुलीला जन्म दिला मात्र यानंतर देखील तिचा त्रास कमी झाला नाही . यानंतर पुढे पतीने तिचा जबरदस्तीने सहा वेळा गर्भपात केला . पती स्वत: तिला गर्भनिरोधक गोळ्या देत असे, असा दावा शायरा बानोने कोर्टात केला होता . वारंवार झालेल्या गर्भपातामुळे तसेच मानसिक त्रासामुळे शायराची तब्ब्येत खालावत गेली. आणि ऑक्टोबर 2015 मध्ये शायराची मुलगी आणि मुलगा पतीसोबत असताना, त्याने तलाकचं पत्र पाठवून पती रिजवान अहमदने तिहेरी तलाक दिला होता. 

शायरासाठी पतीकडून देण्यात आलेला हा तलाक मोठा धक्का होता .एका झटक्यात 15 वर्षांचं नातं संपलं होत. पण खचून न जाता निसर्गदत्त अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या अनिष्ठ प्रथेविरोधात आवाज उठवण्याच ठरवलं. आपण भोगलेल्या यातना इतर महिलांनी भोगू नये, यासाठी त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवण्याची मागणी केली . हे पाऊल म्हणजे धर्माध शक्तींना एकप्रकारे आव्हान होत.

शायरा बानो यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवल्यानंतर देशभर मोठी खळबळ माजली .कट्टर मुस्लीम संघटना शायरा बानोच्या विरोधात उभ्या राहिल्या . मोठ्याप्रमाणावर विरोधाचा तसेच प्रश्नांच्या भडीमाराचा सामना शायराला करावा लागला . दरम्यान शायरा बानोच्या पतीने मागील वर्षी दुसरं लग्न केलं.या प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतल होत . शेकडो वर्षांपासून होणारा हा अन्याय महिला आजपर्यंत निमुटपणे सहन करत होत्या

शायराने केलेल धाडस पाहून हळूहळू इतर मुस्लीम महिला आणि समविचारी संघटना शायराला साथ देऊ लागल्या . शायरा प्रमाणे तिहेरी तलाक मुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या किंवा त्या मार्गावर असणाऱ्या महिला शायराच्या लढ्यात स्वतःच दुखः शोधू लागल्या . इस्लाममधील तिहेरी तलाक या अनिष्ट प्रथेविरोधात समाजातीलच काही धाडसी महिलांनी विरोध केला.आफरीन रहमान, अतिया साबरी , इशरत,शाहबानो बेगम यांनी शायराच्या खांद्याला खांदा लावून न्यायालयीन लढाई सुरु केली.

supreme courtसुप्रीम कोर्टाने मुस्लीम महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे . कोर्टाने सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे. कायदा होण्यास विलंब लागला तरीही तिहेरी तलाकवरील बंदी कायम असेल. आजपासून कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल तसेच सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन केंद्र सरकारला कायदा बनवण्यासाठी मदत करा अस देखील सुप्रीम कोर्टाने सांगितल आहे .

३७ वर्षीय शायरा बानोची दोन्ही मुलं सध्या वडिलांकडे राहतात.मागील कित्येक वर्षांपासून ती त्यांना भेटली सुद्धा नाही . न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर ती म्हणते “मी या प्रथेचा बळी बनले. पण येणाऱ्या पीढीने अशा प्रथेला सामोरं जाऊ नये, यासाठी तिहेरी तलाक घटनाबाह्य घोषित करावा, अशी मी दाद सर्वोच्च न्यायालयात मागितली आहे.