काँग्रेसवर टीका करताना मोदींनी फारच खालचा स्तर गाठला – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटक निवडणूक प्रचारा दरम्यान २०१९ ला जर काँग्रेस देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला तर आपण पंतप्रधान होऊ शकतो असं म्हंटल होत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असतानाच, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र राहुल गांधी यांची बाजू घेत,पक्षाला घरचा आहेर दिलाय. विरोधी पक्षनेत्याने पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी विरोधी पक्षाला पीपीपी म्हणजे पंजाब, पुडुचेरी व परिवार असे बिरूद लावून फारच किरकोळ व मामुली स्तर गाठला आहे, अशी टीका करून सिन्हा म्हणाले की, मोदी यांनी विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका अयोग्य होती. आपण देशातील १३० कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतो याचे भान त्यांनी ठेवायला पाहिजे होते. पीपीपी या आद्याक्षरांच्या आधारे कोटी करणे म्हणजे शिशुवर्गात लघुरूपे शिकवतात की काय असे वाटणारे होते. देश म्हणजे शाळा नव्हे. अशा कोटय़ा करणे तुमच्या मनातील भीती दाखवते. पंतप्रधानांकडून लोकांना परिपक्वतेचे दर्शन घडवणारेभाषण हवे असते. त्यांच्या बोलण्यातून ते दिसले नाही.

राहुल गांधी लोकांना आवडतात. तुम्ही स्वप्ने पाहता तर त्यांनी ती का पाहू नयेत. मोदी सरकारला ललित मोदी, नीरव मोदी, पंजाब नॅशनल बँक, रफाल विमाने खरेदी यात अवघड प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. उलट राहुल गांधी यांनी काही अचूक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही लोकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकारण करीत आहात, अशी टीका त्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...