fbpx

…तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी मोठ विधान केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात जर इंग्रजांचे भारतावर राज्य नसते तर मराठ्यांचे राज्य आणि सुशासन असते आणि भारतातही महान लोकशाही आली असती असं मोठ विधान केले आहे.

तिरुवनंतपुरम येथे झालेल्या “मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टीव्हल ऑफ लेटर्स” या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक विद्यार्थीनी थरुर यांना प्रश्न विचारते, “जर व्यापारी बनून आलेले ब्रिटीश भारतात आलेच नसते, त्यांनी भारतावर राज्य केले नसते, तर आजचा भारत आजच्या सारखाच असता का? की काही वेगळा असता?” या प्रश्नाला उत्तर देताना शशी थरूर यांनी भारतीय इतिहासातील अनेक संदर्भ देत इंग्रजांचे भारतावर राज्य नसते तर मराठ्यांचे राज्य आणि सुशासन असते असे सांगितले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचेही उदाहरण दिले. त्यांनी, “अनेकजण इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे आपलं भाग्य असल्याचा युक्तीवाद करतात. कारण आपण लष्करीदृष्ट्या कमकुवत होतो. आपला भौगोलिक भागही तसा मोठा आणि वैविध्यपूर्ण होता. मात्र, जेव्हा ब्रिटीशांनी भारताच्या कारभारात हस्तक्षेप करत सत्ता काबिज करण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतात मराठा साम्राज्य झपाट्याने वाढत होतं. त्यांचा मोठा प्रभाव होता. अगदी दक्षिणेला तंजावरपर्यंत मराठा साम्राज्य पोहचलं होते.”असं स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी “शिवाजी महाजांनी त्यांच्या सैन्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर युद्धानंतर कुठंही कुराण सापडलं, तर ते कुराण परत देण्यासाठी जोपर्यंत एखादा मुस्लीम व्यक्ती भेटणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कुराणला सन्मानाने वागवले पाहिजे. असे आदेशच शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला दिले होते. जर मराठ्यांचे भारतावर साम्राज्य असते, तर अशीच धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती संपूर्ण भारतात तयार झाली असती. त्यातूनच जपानच्या धर्तीवर भारतातही महान लोकशाही आली असती.” अशा शब्दात शिवाजी महाराजांच्या शौर्याची स्तुती केली आहे .