ICC- शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई – आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आठ महिन्यांपूर्वीच शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मे २०१६ रोजी शशांक मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा मनोहर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच अचानक शशांक मनोहर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाचं म्हणजे, आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. शशांक मनोहर यांनी वैयक्तिक कारणामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

२००८ ते २०११ या काळात शशांक मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर २०१५ साली जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. आयसीसीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाल्यानंतर शशांक मनोहर यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले होते.