अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ शेअर करत, वरुण गांधींचा भाजपावर निशाणा

varun gandhi

नवी-दिल्ली : मागील काही दिवसांपासून भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्या पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. यापूर्वी वरून यांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर वरुण यांनी निशाणा साधला असून यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.

वरून यांनी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून ‘एका विशाल ह्रदयाच्या माणसाचे शहाणपणाचे शब्द’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा मानस स्पष्ट केला आहे. ‘मी सरकारला इशार देतो की तुम्ही या दबाव टाकण्याच्या पद्धती सोडून द्या. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी घाबरणार नाहीत’ असे वाजपेयी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये ‘आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा राजकारणासाठी वापर करू इच्छित नाही. पण आम्ही शेतकऱ्यांच्या योग्य मागणीला समर्थन देतो. जर सरकार दबावतंत्र वापरणार असेल, कायद्याचा दुरुपयोग करणार असेल आणि शांततापूर्ण आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न करेल, तर शेतकऱ्यांच्या संघर्षात उडी घेण्यात आम्ही अजिबात मागे हटणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू’, असे देखील वाजपेयी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या