fbpx

पवारांनी शब्द पाळला : तिवरे धरण बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

टीम महाराष्ट्र देशा : तिवरे धरण दुर्घटनेनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी जोर पकडला होता. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. अशा घटना घडत असतानाचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिवरे धरण घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. या भेटी वेळी शरद पवार यांनी बाधित कुटुंबाना राज्य आणि केंद्र शासन कडून मदत मिळवून देणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार शरद पवार यांनी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात शरद पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनेची वस्तुस्थिती मांडली आहे. आलेल्या आपत्तीत गावाचे आणि ग्रामस्तांचे नुकसान झाले असल्याचं देखील नमूद केले आहे. पत्रात पवार म्हणाले की, आपत्तीत २३ जण मृत्युमुखी पडले. तिवरे भेदवाडी गावातील नदी किनारी असलेली ४५ घरे पूर्णतः वा अंशतः नष्ट झाली आहेत. घराबरोबर जनावरांचे गोठेही वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्राणास मुकले. तसेच रस्ते, पूल, विद्युतव्यवस्था या पायाभूत सुविधांचे देखील नुकसान झाले आहे. धरणफुटीमुळे केवळ पिकेच वाहून गेली नाहीत, तर शेतजमीनही वाहून गेली आहे. आपत्तीत वाचलेल्या मृतांच्या अपत्यांचा व तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

मृत कुटुंबियांच्या वारसांना शासनाने चार लक्ष रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले असले तरी सदर अनुदान हे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थायी आदेशाद्वारे दिले जाणारे अनुदान आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून अनुदान वितरित व्हावे, असे अनेक मुद्दे पवारांनी यावेळी आपल्या पत्रातून मांडले. तर आपत्तीग्रस्त गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय करावी, अशी देखील मागणी केली आहे. तसेच माळीण दुर्घटने वेळी त्यावेळसच्या तत्कालीन सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व इतर मार्गाने मदत बाधित कुटुंबांपर्यंत पोहचवली होती. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेच्या आपत्ती उपाययोजनेत या घटनेच्या कार्यपध्तीचा आढावा घ्यावा, असा सल्ला देखील पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.