fbpx

पुरंदर विमानतळ परिसराचे भाग्य बदलणारा ठरेल – शरद पवार

शरद पवार

पुणे : काही गोष्टी विकासासाठी आवश्यक असतात. पुरंदरच्या विमानतळाबाबत बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी व शासनाने एकत्र बसून प्रकल्प होऊ नये अशी भूमिका न घेता सकारात्मकता दाखवावी, हा प्रकल्प पुणे परिसराचे भाग्य बदलणारा प्रकल्प ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी दिवे-काळेवाडी (ता. पुरंदर) येथे झालेल्या अंजीर परिषदेत केले.

याप्रसंगी मेमाणे – पारगाव येथील विमानतळ विरोध संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी विमानतळाबाबत सकारात्मक बाजू मांडली. विमानतळाच्या सभोवतालची जमीन ही तुमचीच राहणार असून त्यावर प्रकल्प उभारून उत्पन्न वाढीला प्रोत्साहन द्या असे पवार म्हणाले. तसेच यापूर्वी विमानतळाला विरोध करणारे खेड भागातील शेतकरी आमच्याकडे विमानतळ व्हावा म्हणून माझ्याकडे येत आहेत, परंतु ती वेळ आता निघून गेल्याचेही याप्रसंगी पवार यांनी सांगितले.

विमानतळाच्या मंजुरीनंतर सर्वात आधी पवार साहेबांनी दूरध्वनीवरून आपले अभिनंदन केले. समृद्धी प्रकल्पाच्या धर्तीवर येथील शेतक-यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावू, असे याप्रसंगी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्याने विमानतळ प्रकल्पाविषयीची भूमिका स्पष्ट झाल्याने आगामी काळात हा प्रकल्प मार्गी लागेल असेच संकेत मिळत असून प्रकल्पाला विरोध करणारी मंडळी आता यापुढे काय भूमिका घेतील, अशी चर्चा कार्यक्रमानंतर ऐकवयास मिळाली