fbpx

2005साली केलेली चूक आज नडली, शरद पवारांचे महापुराबाबत सूचक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हपुर – सांगली जिल्ह्यावर आलेली जलआपत्ती ही टळली आहे. मात्र या आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावच्या गावं उधवस्त झाली आहेत. त्यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पूढे आले आहेत. सर्वानी आपल्या परीने मदत केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली असून गेले दोन-तीन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

2005 साली जिथपर्यंत पाणी आलं होतं, ती पातळी आपण ग्राह्य धरली ही चूक झाली. मात्र आता कायमस्वरुपी उपाय केला पाहिजे. त्यासाठी यंदाच्या पुराच्या पाण्याची पातळी काढून आणि त्याची नोंद करुन त्यादृष्टीने उपाययोजना केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. तसेच कर्नाटकातले अलमट्टी धरण वेळीच सोडले गेले असते. तर आज ही वेळ आली नसती. कर्नाटक सरकारने पाणी सोडलं नाही. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये संवाद झाला नाही. शेवटी मीच पंतप्रधान मोदींना कळवले. आणि त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला, असे पवार यांनी सांगितले.

अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला घेऊन केंद्र सरकारने बसलं पाहिजे, अलमट्टी वादावर तोडगा काढायला हवा, असेही पवार म्हणाले. तसेच पूरग्रस्तांवर जे कर्ज असेल ते माफ झाले पाहिजे, रस्ते, सार्वजनिक आरोग्य यासाठी आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. पूरग्रस्तांची घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.