आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलंच – पवार

पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे, सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामध्ये शरद पवार यांनी प्रत्यक्ष लढाईतून माघार घेतली असली तरी, आघाडीला यश मिळवून देण्यासाठी ते काम करत आहेत. शनिवारी पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील कार्यकत्यांची बैठक त्यांनी घेतली आहे.

आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आता यश आपलंच असल्याची खात्री झाल्याची भावना यावेळी पवार यांनी बोलताना व्यक्त केली आहे, तसेच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला पवार यांनी दिला आहे.

सत्ताधारी पक्षांकडे सांगण्यासारखं काहीच नाही. फक्त पैसे आहेत. तुम्ही त्यावर लक्ष ठेवा. भाजपच्या कार्यकर्त्यांना खासगीत सांगा, परत पैसे मिळतील की नाही माहीत नाही, उगाच आता मिळालेले खर्च करू नका, असा खोचक टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, पुण्याची निवडणूक हि देशाला दिशा देणारी आहे, त्यामुळे हि निवडणूक नेहमीप्रमाणे चर्चेत आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा आघाडी जिंकणार यात शंका नाही, असं पवार म्हणाले.