समीर वानखेडे प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

sameer-sharad

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. दरम्यान, आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी समीर वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची खबरदारी घेतली जात आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी काही माहिती दिली. यंदा मला ५४ वर्ष विधिमंडळात होतात. राज्यात किंवा केंद्रात काम करायला २६ वर्ष पूर्ण होतात. आम्ही नेहमीच प्रशासनाशी संबंध चांगले ठेवलेत. नवाब मलिक यांनी एका व्यक्तीविषयी भूमिका मांडली. मी थोडी माहिती घेतली. समीर वानखेडे हे अधिकारी याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर भाष्य करत नाही. पण या प्रकरणात दोन एजन्सी आहेत. एक एनसीबी आणि दुसरी मुंबई पोलीस.

तसेच यामध्ये काही लोक पकडले आहेत. कुठेही गुन्हा वगैरे घडला, तर पोलीस किंवा केंद्रीय यंत्रण आधी पंचनामा करतात. पंचांच्या समोर लिखापढी होते. अधिकारी करत असलेली कारवाई योग्य आहे याची खात्री वाटावी अशा पद्धतीचे हे पंच असायला हवेत. पण जे कोण गोसावी होते, ते गेले काही दिवस फरार आहेत का काय माहिती नाही. पंच म्हणून ज्यांची निवड केली असेल, ती व्यक्ती समोर यायला तयार नाही, याचा अर्थ त्यांची नैतिकता संशयास्पद दिसत आहे. पण ज्या नार्कोटिक्स एजन्सीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱ्यांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहे, हे त्यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, ‘अशा प्रकारात आरोप केल्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी सगळ्यात आधी भाजपाचे नेते होते. मला कळेना की ही जबाबदारी, हे काँट्रॅक्ट भाजपाच्या नेत्यांनी कधी घेतली. त्यात नुसतेच ते येतात असं नाही. एका ठिकाणी छापे टाकले, त्याबाबत एक विधान एका केंद्रीय राज्यमंत्र्याचे होते की हे आमचंच काम आहे. मला माहिती नव्हते. सरकारमध्ये काम केलं आहे मी. पण हे आमचंच काम असतं ही आमच्या ज्ञानात त्यांनी भर टाकली. ते मला कुठे भेटले, तर जाहीरपणे आभार मानेन त्यांचे. पण मुद्दा हा आहे की शासकीय यंत्रणेकडून सत्तेचा गैरवापर होत असेल, तर त्याचं समर्थन करताना भाजपाचे लोक दिसत आहेत,’असेही यावेळी पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या