शरद पवार याचं मानसिक संतुलन ढळलेलं – भाजप आमदार

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा:  नेहमी आपल्या पुरोगामी भूमेकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अप्रत्यक्षरित्या तिहेरी तलाकच समर्थन केल्याचं चित्र काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. हल्लाबोल यात्रेच्या औरंगाबाद येथील समारोप सभेत बोलताना तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही असं वक्तव्य करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.शरद पवार यांच्या विधानावर आता भाजपकडून मोठ्याप्रमाणावर टीका केली जात आहे. कल्याण (प)चे आमदार नरेंद्र पवार यांनी शरद पवार याचं मानसिक संतुलन ढळलेलं असल्याची टीका ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना केली आहे. त्याच बरोबर त्यांनी एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली असून तिहेरी तलाकमुळे उध्वस्त होणारे भगिनींचे संसार पवार साहेबांना दिसत नसावेत असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले शरद पवार 

आज ट्रिपल तलाकचा मुद्दा काढला जातोय. मुस्लिम भगिनींना खरंच न्याय द्यायचा असेल तर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते, धर्मगुरु यांना विश्वासात घेऊन पावले टाकावीत. तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही. तुम्ही कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही .

आमदार नरेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट

पवारांचा_तोल_सुटतोय

आजच्या औरंगाबादच्या डल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणतात, तलाक हा कुराणाचा आदेश, त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्यकर्त्यांना अधिकार नाही.वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या मुस्लीम भगिनींना न्याय दिला. पिचलेल्या भगीनी ट्रिपल तलाकच्या बळी पडत होत्या, ना कुठे दाद मागता यायची, ना कुणाकडे न्याय मिळायचा. मात्र या भगिनींना मोकळा श्वास घेण्याची संधी जबाबदारी म्हणून भाजपाने दिली. संसदेत ट्रिपल तलाक प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले. मात्र आता राष्ट्रवादीच्या आदरणीय शरद पवारांना ते विधेयक चुकीचं असल्याचे वाटतंय.
तोंडी तीन तलाक या अन्यायकारक, जुलमी, आणि जुनाट कुप्रथेला कायद्याद्वारे आळा बसवला जाईल. देशातल्या नऊ कोटी मुस्लीम महिलांसाठी तो आनंदाचा क्षण आहे आणि एकूणच भारतीय लोकशाहीसाठीही महत्वाचा दिवस आहे. भारतीय मुस्लीम समाजाच्या सुधारणेची पहाट आहे.
जातीय राजकरण करणाऱ्या पवार साहेबांना मुस्लीम भगिनीच्या व्यथा कळत नसाव्यात. काही शब्दामुळे आयुष्य बरबाद होतात. त्या भगिनीच्या डोळ्यातली आसवं पवार साहेबांना दिसत नसावीत. उध्वस्त होणारे भगिनींचे संसार पवार साहेबांना दिसत नसावेत….
विकासाचं राजकरण करताना आम्हाला समाजाच्या यातना बघायला शिकवलं। प्रस्थापितांच्या विरोधात लढताना विचारांची पातळी जपायला शिकवली.
मात्र सत्तेच्या बाहेर राहिल्याने आदरणीय पवार साहेबांचा तोल सुटत चाललाय एवढं खरं…..!
– नरेंद्र पवार

शरद पवार मतांचे सौदागर – गिरीराज सिंग
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल औरंगाबादमधील सभेत तलाकच्या प्रक्रियेतील सरकारच्या हस्तक्षेपाला पाठींबा देणार नसल्याच सांगितले होते. याबदल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांना विचारले असता ‘२२ मुस्लीम देशांमध्ये तलाक संपुष्टात आला आहे. मात्र भारतामध्ये असणारे मतांचे सौदागर तलाकच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठा अडथळा असल्याच म्हणत सिंग यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading...