सोलापूरसाठी शरद पवारांचा ‘मास्टर प्लॅन’, एकाच धडाक्यात माढ्यासह उस्मानाबाद काबीज करणार ?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिरंजीवांसोबत वडिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी ‘विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह भाजपमध्ये आल्याच’ मुख्यमंत्र्यांचे विधान सर्व काही सांगणारे आहे. मोहिते पाटील घराण्याने राष्ट्रवादीला रामराम केल्याने जिल्ह्यामध्ये पक्षाला धक्का मानला जात आहे. मात्र दुसरीकडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वेगळाच गेमप्लॅन आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या धक्याचे हादरे संपूर्ण जिल्ह्यात बसणार आहेत. विजयसिंह यांना मानणारा वर्ग प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असल्याने राष्ट्रावादी कॉंग्रेसला गळती लागण्याची भीती देखील आहे. सध्या माळशिरस आणि करमाळा विधानसभेचे आमदार हे कट्टर विजयदादा समर्थक आहेत. तर बार्शीचे माजी आ राजेंद्र राऊत यांना देखील मोहिते पाटलांनी कधीकाळी आ. दिलीप सोपल यांना चीतपट करण्यासाठी रसद पुरवली होती. सध्या राऊत भाजपमध्येच असल्याने विजयसिंह हे पुन्हा एकदा कट्टर पवार समर्थक असणारे दिलीप सोपल यांना पाडण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

दुसरीकडे माढा आणि पंढरपूरमध्ये देखील मोहिते पाटलांची विशेष ताकद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किमान सहा ते सात विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील पिता – पुत्र घुसखोरी करून राष्ट्रवादीला आणखीन दणका देवू शकतात. मात्र राजकारणातील चाणक्य असणारे शरद पवार यांनी सोलापूरच काय पण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ देखील हस्तगत करण्यासाठी मास्टर प्लॅन आखल्याच बोललं जात आहे.

असा असू शकतो पवारांचा मास्टर प्लॅन

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांचे कडवे विरोधक आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील लढाई झाल्यास राज्यातील सर्वाधिक हायव्होल्टेज लढत होवू शकते. संजय शिंदे यांना राष्ट्रावादीसह त्यांनी तयार केलेल्या स्वतंत्र गटाची साथ मिळेल.

दुसरीकडे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना उस्मानाबाद लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारी राष्ट्रवादीने चालवली आहे. स्वतः दिलीप सोपल हे लोकसभेसाठी उत्सुक नाहीत, मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण विचार करू म्हणत ते एकप्रकारे लढण्याची तयारी देखील दाखवत आहेत. सोपल लोकसभेला गेल्यास भाजपमध्ये असणारे राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत बार्शी विधानसभा देखील हातात ठेवण्याची तयारी पवारांनी चालवल्याच बोललं जात आहे. उस्मानाबाद मतदारसंघात बार्शी तालुका सर्वात मोठा असून सोपल यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळू शकते.

भाजपच्या गटात असलेले राजेंद्र राऊत हे जि प अध्यक्ष संजय शिंदे यांचा शब्द पडून देत नाहीत, संजय शिंदे हे आ दिलीप सोपलांचे ऐकण्यात आहेत. तर सोपल हे शरद पवार यांचा आदेश धुडकावू शकत नाहीत. त्यामुळे पवारांनी आदेश दिल्यास सोलापूर जिल्ह्यामध्ये आजवर एकमेकांचे हाडवैरी राहिलेले सर्व नेते एकत्र येऊ शकतील.