ऐतिहासिक मुलाखत : उद्या शरद पवार देणार राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्य तसेच देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतली जाणारी राष्ट्रीवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत. जानेवारी महिन्यात या मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचारानंतर अनिश्चित काळासाठी ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर आता ही उत्कंठावर्धक मुलाखत २१ फेब्रुवारी रोजी अर्थात उद्या बीएमसीसी ग्राउंडवर घेतील जाणार आहे.

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल तणावाच वातावरण या सर्व गोष्टींच्या अनुशंगाने आयोजकांनी ही मुलाखत पुढे ढकलली होती. याआधी ३ जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले मात्र त्यावेळेस देखील तारीख बदलून ६ जानेवारी करण्यात आली होती. पण अखेरीस ही तारीख देखील रद्द करण्यात आली. अखेर आता ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलाखत उद्या होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.