‘शरद पवारांच्या कष्टाने पक्ष उभा राहिला आहे, बेशिस्तपणा खपवून घेणार नाही’; टोपेंचा इशारा

rajesh tope

औरंगाबाद : पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष मजबूत करण्याचे काम करावे. पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने हा पक्ष उभा केला आहे. या पक्षात शिस्त महत्त्वाची आहे. बेशिस्तपणा कदापिही पक्ष खपवून घेणार नाही. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पैठण येथे लगावला.

संभाव्य नगर परिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी आमदार वाघचौरे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवायला हवे. शरद पवार यांच्या मोठ्या कष्टाने हा पक्ष उभा राहिला आहे. या पक्षात शिस्त महत्त्वाची आहे. बेशिस्तपणा कदापिही खपवून घेणार नाही. असा इशाराही त्यांनी बोलताना दिला आहे.

पक्षाच्या नेत्यांनी पदे भोगली आहेत. आता ग्रामीण भागातील व शहरातील कार्यकर्त्यांना पद मिळण्यासाठी नेत्यांनी आपसांतील गटबाजी दूर करून एकत्र येऊन काम करावे. असे आवाहनही त्यांनी केले. तालुक्यात अनेक विकासाचे कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामासाठी पाठपुरावा करावा ते कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी पाठपुरावा करावा. यावेळी बोलताना पैठण येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र बिडकीन येथे हलविण्यात येणार असून पैठण येथे लवकरच शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या