स्वत्रंत लिंगायत धर्म मान्यतेसाठी शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट

sharad-pawar-will-meet-to-president-of-india-for-separate-lingayat-dharm

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील लिंगायत समाज आपल्या स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. पण या लढ्याला यश मिळताना दिसत नाही. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या लढ्यात उतरण्याचे संकेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.

नाशिक येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलन सभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘लिंगायत समाज आपल्या स्वतंत्र धर्माच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. आता त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सर्व परिवार असणार आहे. शरद पवार हे स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी सर्वात आधी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याच यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

देशभरातील लिंगायत समाजाच्या वतीने स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. विशेषता कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने असल्याने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मागील वर्षभरात मोठे मोर्चे काढण्यात आले. इंग्रज सत्तेच्य आधी आपली स्वतंत्र लिंगायत धर्माची ओळख असल्याचा दावा आंदोलकांकडून केला जात आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. यानंतर आता खुद्द शरद पवार याबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे आव्हाड यांच्याकडून देण्यात आलेले संकेत नक्कीच भविष्यातील समीकरणे बदलणारे ठरणार आहेत.