fbpx

अजित पवारांची घोषणा; शरद पवार माढा मतदार संघातून लढणार

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय कार्यसमितीची महत्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

लोकसभेत बसून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी डावपेच आखता येतात, त्यामुळेच पवारांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्याचाच विचार करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना गळ घातली आहे. पवार साहेब तुम्ही माढ्यातून निवडणूक लढवावी असे दादांना म्हण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. परंतु त्याची राजकीय झळ स्वतः विजयदादा यांनाच बसत आहे.

शरद पवार यांनी 2009 साली माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते. त्यावेळी शरद पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मतं पडली होती, तर सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते, आणि महादेव जानकर 98 हजार 946 मते पडली होती.

माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार निवडून आले होते तर २०१४ साली मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीचे उमेदवार व सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता.

दैनिक सामनाने याबाबत अधिकृत वृत्त दिले आहे.