शरद पवार करणार पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा

blank

टीम महाराष्ट्र देशा : उद्या भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आणि केरळमध्ये पूरस्थिती आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठ निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार पूरग्रस्त भागामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापुरात महापूर आला. येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान यंदाचा स्वातंत्र्य दिन शरद पवार हे पूरग्रस्त भागात साजरा करणार आहेत. १५ ऑगस्टला शिरोळमध्ये ध्वजवंदन करणार आहेत

तसेच ध्वजवंदना केल्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. त्याचबरोबर चिखली, आंबेवाडी, वडंगे, कसबा बावडा या गावांनाही ते भेटी देणार आहेत. नंतर कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करून पुण्याकडे निघणार आहेत. सध्या या भागात जनजीवन विस्कळीत झाल्याने जनतेचे मनोबल खचले आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीमालाची मोठी हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे.