शरद पवारांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

sharad pawar manmohan sing

औरंगाबाद: महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यात शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्रील विकासा बरोबरच देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले.

शरद पवार यांच्या जीवन कार्यावर आधारित शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते एमजीएम च्या रुक्मिणी सभागृहात करण्यात आले . यावेळी खा. शरद पवार पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, धीरूभाई मेहता, एमजीएम चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे उपस्थित होते.

शरद पवार यांनी सामाजिक कार्यात देखील मोलाचे योगदान दिले असुन महाराष्ट्रसह देशासाठी वेळोवेळी ते संकटमोचक म्हणून धावून आल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. देशात बाबरी मशीद विध्वंसानंतर भडकलेल्या दंगली असो की किल्लारीत झालेला भूकंप पवारांनी दोन्ही घटनांना अतिरिक्त संवेदनशीलतेने हाताळले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर झालेल्या जातिय दंगली आटोक्यात आणण्यासाठी पवारांनी आतोनात प्रयत्न केल्याचे मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. केंद्रात नरसिंहराव यांच्या कार्यकाळात पवार संरक्षण मंत्री होते.त्याकाळी देश गंभीर आर्थिक संकटात असताना पवारांनी आपल्या खात्याचे बजट पाच हजार कोटी रुपये कमी केल्याची आठवण त्यांनी सांगितली. पवार फक्त महाराष्ट्राचेच आधारस्तंभ नसुन देशासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन मनमोहनसिंग यांनी केले आहे.