२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश

शरद पवार

कुर्डूवाडी : मी बारामती मधुन आराम केला आणि सुप्रिया साठी बारामती मतदार संघ मोकळा केला. आ. विनायकराव पाटिल यांनी देखील दहा वर्ष आमदारकी नंतर आराम केला. जिल्ह्यातील व राज्यातील राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी पंचहत्तरी पार केली त्यांनी आराम करायला काहीच हरकत नाही. माढा विधानसभा मतदार संघातुन सलग पाच वेळा  निवडून येणाऱ्या आ. बबनराव शिंदे यांनी आराम करुन नव्या तरुण नेतृत्वाला संधी द्यावी असा सल्ला वजा आदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला.

कुर्डूवाडी येथील के.एन.भिसे यांच्या पुतळा अनावरण व माजी आमदार विनायकराव पाटिल यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री पद्मसिंह पाटिल , आ गणपतराव देशमुख , आ बबनराव शिंदे , सुधाकर परिचारक , आ. भारतनाना भालके , मा. दिपक आबा साळुंखे , माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख विरोधी पक्षनेते बळीराम साठे , जि.प. अध्यक्ष शिंदे , रश्मी बागल , रामदास कैकाडी महाराज , आ. दत्तात्रय सावंत , आ. दिलीप सोपल , विलासराव घुमरे, रणजित शिंदे , सुरेश बागल , जयंत पाटिल , मनोहर सपाटे , जयंवतराव जगताप यांच्यासह अनेक दिग्गज पुढारी ऊपस्थित होते.

करमाळा विधानसभा मतदार सघांतुन रश्मी बागल कोलते आणि माढा विधानसभा मतदार संघातुन जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी देण्याचे संकेत पवारांच्या या वक्तव्यातून मिळत आहेत. माढ्यातुन आ. बबन शिंदे राष्ट्रवादी पक्षाच्या तिकीटावर गेली 25 वर्ष आमदार आहेत. आत्ता या जागेवर नव्या दमाचा चेहरा पाहिजे असे परखड विधान पवार यांनी केल्यामुळे नक्की माढ्यातुन कोण लढणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.