fbpx

पवारांना हवी आहे एअर स्ट्राईकमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावासकट यादी

टीम महाराष्ट्र देशा- एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरून सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा देणारे राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर आपला खरा रंग दाखविला आहे. भारताच्या वायूसेनेनं केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा नेमका किती? याची माहिती सरकारने द्यावी, अशी जाहीर मागणी पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना केली आहे. पवार एवढ्यावरचं थांबले नाहीत तर जवानांच्या शौर्याबद्दल एकप्रकारे शंका उपस्थित करत त्यांनी नावासकट जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांची माहिती सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

टी.व्ही.नाईन मराठी या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मिडीयावर पवार यांच्या वक्तव्याचा नेटकरी चांगलाच समाचार घेत आहेत. विशेष म्हणजे पवार यांनी २५ फेब्रुवारीला एक ट्वीट करत एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरून कौतुक देखील केलं होतं.

यानंतर भारतीय वायू दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट प्रशिक्षण अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात दोनशे ते अडीचशे अतिरेकी ठार झाल्याची माहिती पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली होती.यासाठी त्यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाचा दाखला दिला होता. चर्चेदरम्यान जैशचा बालाकोट जंगलातील प्रशिक्षण अड्ड्यासह अनेक अ्डडे उद्धवस्त केल्याची माहिती मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. या हल्ल्लात 200 ते 250 अतिरेकी ठार झाल्याची माहिती पवार यांनी स्वतः माध्यमांना दिली होती. मग असं असताना पवार यांनी आज ही मागणी फक्त राजकारण करण्यासाठी केली आहे का? असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

आज नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

“आम्ही सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा दिला. याप्रकारात राजकारण न आणण्याची भूमिका आम्ही घेतली, आम्ही त्याच्याशी आजही प्रामाणिक आहोत.इथं आता बऱ्याच लोकांना सांगण्यात आलं की समोरच्या बाजूचे मारले गेले. आपल्या जवानांच्या शौर्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पण वाचनात असं आलं की अमेरिका आणि इंग्रजी जी वृत्तपत्र आहेत, ती असं म्हणतात की आकडा सांगा. त्यांनी शंका उपस्थित केली.काल तीन लोकांची मी मुलाखत पाहिली, नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी. पण कुणीच आकडा सांगितला नाही. किती लोक मारले गेले हे सांगितलं नाही. त्यामुळे या शंका लोकांच्या मनात राहू नये म्हणून सरकारने लवकर त्याची माहिती जाहीर करावी. त्यांच्या नावासकट जे लोक मृत्यूमुखी पडले…कारण जे लोक मृत्यूमुखी पडले त्याचा अर्थ त्यांची बॉडी आपल्याकडेच असणार ना? त्यामुळे ती व्यक्ती कोण, त्याचं नाव काय, त्याचा फोटो हा देऊन टाकावा, म्हणजे याबद्दलची शंका लोकांच्या मनातून जाईल.”