फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात बालिश मुख्यमंत्री – पवार

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळावरून पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका 

मुंबई:कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असताना ‘राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वाधिक बालिश मुख्यमंत्री आहेत,”अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.विशेष म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे.

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळावरून  पवारांनी  थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलंय. कर्जमाफीच्या मुद्यावर शरद पवारांनी फर्स्टपोष्ट या न्यूज 18नेटवर्कच्या वेबसाईटला सविस्तर मुलाखत दिली आहे ज्यात पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाबाबत काय म्हणाले शरद पवार ?
”गेल्यावेळच्या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेस -राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील सहकारी बँकांना झाला, हा मुख्यमंत्र्यांचा आरोप अतिशय बिनबुडाचा असून त्यांच्या या अशा संशयीवृत्तीमुळेच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या मुख्यमंत्र्यांचा ना सरकार यंत्रणेवर विश्वास आहे ना बँकिंग प्रणालीवर !, काही मोजक्या ओएसडींच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी हा ऑनलाईन कर्जमाफीचा घोळ घातला आणि त्यातून कर्जमाफीची अंमलबजावणी रखडलीय. ”तसंच या कर्जमाफीच्या घोटाळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँकाना जबाबदार धरलं असेल तर मग या बँकाही काँग्रेस राष्ट्रवादीच चालवतंय का ? असा खडा सवालही शरद पवारांनी उपस्थित केलाय.